न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. ३१ मार्च २०२६) :- दिघी पोलीस ठाण्यात महापालिकेसह फिर्यादी आणि त्यांच्या पतीची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादीची फसवणूक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी परिसरातील एका गट क्रमांकांवरील मिळकतीवर हॉस्पिटलसाठी आरक्षण होते. मात्र आरोपींनी ही जमीन बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडे खोटे दस्तऐवज सादर केले. फिर्यादी महिला (वय ६५) यांच्या तसेच त्यांच्या पतीच्या बनावट सह्या करून “ना हरकत” दाखविणारे कागदपत्र तयार करण्यात आले.
हे बनावट दस्तऐवज उपसंचालक, नगररचना व विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे सादर करून संबंधित जागेवरील हॉस्पिटल आरक्षणात फेरबदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेत फिर्यादी आणि त्यांचे पती तसेच महापालिकेची फसवणूक करून शासकीय नोंदींमध्ये बदल घडवून आणण्याचा हेतू असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी महिला आरोपींसह संपत कोरडे, ज्ञानेश्वर कोरडे व सोमनाथ कोरडे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करण्याचा हा गंभीर प्रकार असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महापालिकेच्या आरक्षण प्रक्रियेत अशा प्रकारच्या फसवणूकीचा प्रयत्न उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.










