- पिंपरी-चिंचवडची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधोरेखित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक ६६ वी राष्ट्रीय अजिंक्यपद व ६३ वी ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात पार पडली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या स्पर्धेचा अंतिम निकाल महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. देशभरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली.
या स्पर्धेत ‘भारत श्री २०२६’ किताब महाराष्ट्राच्या हरमीत सिंग यांनी पटकावला, तर उमेश गुप्ता उपविजेते ठरले. विविध गटांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, मणिपूर, ओडिसा व इतर राज्यांतील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन व पिंपरी-चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहर क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर असून अशा स्पर्धांमुळे तरुणांना व्यासपीठ मिळते, असे महापौरांनी सांगितले.














