- नगरसेवक बाबा त्रिभुवन यांची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाले स्वच्छ करण्याचे आदेश दिल्यानंतर रहाटणी परिसरात नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबा त्रिभुवन यांनी पुढाकार घेत प्रभागातील नाल्यांची साफसफाई आरोग्य विभागामार्फत सुरू केली आहे.
बाबा त्रिभुवन यांनी स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना योग्य व दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती तसेच डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
साफसफाईचे काम सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरातील रहिवाशांनी बाबा त्रिभुवन यांच्या तत्परतेचे कौतुक केले असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे पाणी साचणे, पूरस्थिती आणि साथीच्या रोगांचा धोका कमी होण्यास मदत होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे रहाटणी परिसरात स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.

















