- भजन-कीर्तन, महाअभिषेक व रक्तदान शिबिरास भाविकांचा उस्फुर्त सहभाग..
- महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भक्तीभावपूर्वक निस्वार्थ सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- बिजलीनगर परिसरात हनुमान मित्र मंडळ आणि एम.एस.ई.बी. बिजलीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २) श्रीराम आणि हनुमान जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रामनवमी ते हनुमान जयंतीचे औचित्य साधत सात दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप झाला. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला. सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. समाज प्रबोधनात्मक भारुडाच्या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती.
यासोबतच समाजोपयोगी उपक्रम म्हणून अक्षय ब्लड बँक कडून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने रक्त संकलित झाले.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात महाअभिषेक, पूजा-अर्चा, होमहवन, तसेच भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन महोत्सव आणि भक्ती संगीताच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य तथा शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर, महावितरणच्या पुणे परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधिक्षक अभियंता गायकवाड साहेब, कार्यकारी अभियंता देवकर साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास भोसले, तसेच महेश देशमुख, किरण सरोदे, तुषार दंडवते, रत्नदीप काळे, सुजित ननावरे, जाधव, गुज्जू वाघमारे, कपिल शिंदे, रवी दराडे, जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष विनायक पवार आणि भूषण पाटील, सचिव किशोर चोभे, खजिनदार रमेश बोरसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.










