- कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पीएमआरडीएत नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ एप्रिल २०२६) :- राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल केला आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले दीपक सिंगला यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर येथे करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची पीएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी २ एप्रिल २०२६ रोजी जारी केले आहेत.
दरम्यान, मंजुलक्ष्मी यांच्या कोल्हापूर येथील जागी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या सध्याच्या पदाचा कार्यभार तत्काळ सुपूर्द करून नवीन पदावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
या बदलामुळे पीएमआरडीएच्या कामकाजाला नवे नेतृत्व मिळणार असून प्रलंबित प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नागपूर येथील मनरेगा विभागात सिंगला यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.










