- आळंदी दुहेरी हत्याकांडातील नराधम २४ तासांत अटकेत..
- निष्पाप जीवांना मिळाली न्यायाची पहिली पायरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ३ एप्रिल २०२६) :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन सहवासाने पवित्र झालेल्या आळंदी नगरीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने प्रत्येकाच्या मनाला चटका लावला आहे. सहा वर्षांची निष्पाप धनश्री आणि तिची काळजी घेणारी ७० वर्षीय मंगल शिंदे यांचा झालेला निर्दयी खून ही केवळ गुन्हेगारी घटना नसून मानवतेलाच काळिमा फासणारी आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता.
या अमानुष कृत्यानंतर आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी विलंब न लावता तपासाची सूत्रे हाती घेतली. फिर्यादी संगीता केदारी यांच्या संशयावरून विनायक तुकाराम भवारी (वय ३१) याचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आळेफाटा येथे असल्याचे समजताच गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक तात्काळ रवाना झाले.
पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल समाधानजवळ आरोपीला शिताफीने पकडण्यात आले. चौकशीत त्याने कौटुंबिक कलहातून हा भयंकर गुन्हा केल्याचे समोर आले.
नेमकी घटना काय?
फिर्यादी महिला रात्रपाळी कामासाठी एका हॉस्पिटलमध्ये गेल्याने जाताना त्यांनी सहा वर्षांची नात धनश्री हिला शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) यांच्याकडे सुरक्षिततेसाठी सोपवले होते. मात्र १ एप्रिल रात्री ते २ एप्रिल सकाळ दरम्यान आरोपी विनायक भवारी घरात शिरला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याने दोघींवर हत्याराने निर्दयी हल्ला करत त्यांचा खून केला. सकाळी फिर्यादी घरी परतल्यावर ही भीषण घटना उघडकीस आली.
न्यायाचा पहिला किरण…
या कारवाईमुळे दुःखात बुडालेल्या कुटुंबाला न्यायाचा पहिला किरण मिळाला असला, तरी हरपलेले दोन निष्पाप जीव परत येणार नाहीत, ही वेदना कायमच राहणार आहे. संतांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.










