न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात वेश्या व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून, पोलिसांनी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कुठे केली कारवाई…
पहिली घटना दक्षिण महाळुंगे परिसरातील कुरुळी गाव हद्दीत घडली. येथे वेलकम लॉजसमोर सार्वजनिक ठिकाणी तीन महिलांकडून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून संबंधित महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना दिघी परिसरात समोर आली. वडमुखवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर एका महिलेने वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अश्लील हावभाव व शब्दांद्वारे आकर्षित करत सार्वजनिक शिस्त भंग केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तिसऱ्या घटनेतही दिघी परिसरातील आणखी एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली. अगत्य लॉजसमोर सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना बोलावणे, अश्लील हावभाव करणे आणि सार्वजनिक शिस्त बिघडवणे यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिन्ही कारवाया अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत करण्यात आल्या असून संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे.










