- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक उपक्रम; आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ११ ते १६ एप्रिलदरम्यान ‘विचार प्रबोधन पर्व’ाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भीमसृष्टी, पिंपरी येथे होणाऱ्या या पर्वात महानाट्य, शाहिरी जलसा, गीत-नृत्य, काव्य संमेलन, चर्चासत्र आदी विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून देश-विदेशातील नामांकित कलाकार व अभ्यासक सहभागी होणार आहेत. ११ एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रमाने सुरुवात होऊन १६ एप्रिलला ‘महासूर्य’ महानाट्याने समारोप होणार आहे.
या पर्वाचा उद्देश फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांची जाणीव समाजात रुजविणे हा आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.










