न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ एप्रिल २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या पेठ क्र. १२ व ३०-३२ गृहयोजनेतील १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी आकुर्डी येथे पारदर्शक पद्धतीने पार पडली. मानवरहित व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेल्या या प्रक्रियेमुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले असून, लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळाले.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी सहआयुक्त पूनम मेहता व रूपाली आवले-डंबे उपस्थित होत्या. चौधरी यांनी प्रशासनाला लाभार्थ्यांना कर्ज व इतर प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
‘ओव्हरसाईट कमिटी’च्या देखरेखीखाली ही सोडत पार पडली. उपस्थित राहू न शकलेल्या अर्जदारांसाठी यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रक्षेपणाची सुविधा देण्यात आली. ईडब्ल्यूएस व एलआयजी गटातील निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती पाठविण्यात आली आहे.










