न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि.12 एप्रिल २०२६) :- बनावट विसार पावती आणि खोट्या सह्यांचा वापर करून तब्बल ११८ गुंठे जमिनीच्या व्यवहारात ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रावेतमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी संदीप शिवाजी भोंडवे (रा. रावेत) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलाब भोंडवे यांच्या मालकीची स.नं. १०३/३ येथील ११८ गुंठे जमीन आहे. या जमिनीबाबत आरोपी संदीप भोंडवे याने फिर्यादी, त्यांचा भाऊ सिताराम भोंडवे आणि पुतणी जोस्तना कदम यांच्या बनावट सह्या व अंगठ्याचे ठसे वापरून एक बनावट विसार पावती (नोटरी दस्त क्र. १७२६) तयार केली.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने सुहास गोलांडे, दिलीप जैन आणि भावेश सोनिगरा यांच्यासोबत समजुतीचा करारनामा केला. या व्यवहारापोटी आरोपीने संबंधितांकडून एकूण ७५ लाख रुपये घेऊन फिर्यादीची व इतरांची फसवणूक केली.
फसवणुकीचा हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. मनिष जैन यांच्यासोबत केलेला एक जुना दस्त रद्द करण्यासाठी फिर्यादींनी दिलेले २० लाख रुपये देखील आरोपीने संबंधित व्यक्तीला परत न करता स्वतःकडेच ठेवले. अशा प्रकारे जमिनीच्या व्यवहारात आणि रोख रकमेत आरोपीने फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर रावेत पोलिसांनी संदीप शिवाजी भोंडवे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) कुंभार करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.










