न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि.१३ एप्रिल २०२६) :- पुणे – माण रोडवर अवजड वाहनांना बंदी असतानाही नियम धाब्यावर बसवून चालविलेल्या एका टेम्पोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत यश रविंद्र कुंभारे (वय २३) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक केली आहे.
दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास यश कुंभारे हा आपल्या होंडा ॲक्टिव्हा वर माण रोडवरून जात होता. यावेळी भारत पेट्रोल पंपाजवळ प्रभाकर पारखी फ्लोअर मिल, समोरून येणाऱ्या टाटा टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात यश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना या परिसरात प्रवेश बंदी घातली आहे. आरोपी चालक दिलीप मधुकर वाकचौरे (वय ४६, रा. घाटकोपर, मुंबई) याने या आदेशाचे उल्लंघन केले. आपल्या कृत्यामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो याची जाणीव असतानाही त्याने गर्दीच्या वेळी वाहन चालवून हा अपघात घडवून आणला.
मयत तरुणाचे वडील रविंद्र पांडुरंग कुंभारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या करत आहेत.










