न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि.१२ एप्रिल २०२६) :- पुण्यातील महाळुंगे परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका निर्दयी आईने तिच्या ६ वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तिचा प्रियकर सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बसरीन मेहबूब शेख (वय २७) ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. ती विवाहित असून तिला तीन मुले आहेत. मात्र, गेल्या एका वर्षापासून ती तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड याच्यासोबत कुरुळी (ता.खेड) येथे लिव्ह-इनमध्ये राहत होती. बसरीनचा ६ वर्षांचा मुलगा ‘आवेज’ हा या दोघांच्या संबंधात अडथळा ठरत होता. याच रागातून ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री २३:३० वाजण्याच्या सुमारास बसरीन आणि राम या दोघांनी मिळून आवेजला बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले. एवढेच नाही तर त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याची निर्घृण हत्या केली.
हत्या केल्यानंतर हा प्रकार नैसर्गिक मृत्यू वाटावा यासाठी आरोपींनी बनाव रचला. आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. त्याचा मृतदेह राम कजेवाड याच्या कारमधून अंत्यसंस्कारासाठी बीडमधील धर्मापुरी येथे नेण्यात आला. मात्र, फिर्यादी इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली.
मृत मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने आणि शवविच्छेदन अहवालात धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर पोलिसांनी बसरीन शेख हिची कसून चौकशी केली. या चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपी राम कजेवाड याचा शोध सुरू आहे.










