- ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’मध्ये परदेशी शिक्षण-रोजगार संधींवर मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ एप्रिल २०२६) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचारांची आधुनिक काळातही मोठी उपयुक्तता असल्याचे मत ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त व डॉ. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादात देश-विदेशातील तज्ज्ञांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष सहभाग घेत जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. नंदू मोरे, रेवा रॉय, धम्मचारी सुदिप्ता, विरेंद्र घुटके यांसह विविध मान्यवरांनी कौशल्यविकास, तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य आणि स्थानिक भाषा यांचे महत्त्व अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, अॅनिमेशन यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. संजय खोब्रागडे, प्रा. केशव वाघमारे आदी तज्ज्ञांनी आंबेडकरांच्या विचारांमधील समता, न्याय आणि जागतिक दृष्टीकोन यांचा आजच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी व्यापक दृष्टी स्वीकारावी, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, सायंकाळी गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी कार्यक्रमाला रंगत आणली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.










