- रुग्वेद शेवाळेची सैनिक शाळेकडे झेप….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ एप्रिल २०२६) :- पिंपळे सौदागर येथील साई वैभव (सेव्हन स्टार लेन) परिसरातील कु. रुग्वेद शशिकांत शेवाळे याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२६ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तामिळनाडूतील अमरावतीनगर येथील सैनिक शाळेत त्याने प्रवेश निश्चित केला आहे.
देशभरातून सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत रुग्वेदने लेखी परीक्षेसह कठीण मानली जाणारी वैद्यकीय चाचणीही यशस्वीरीत्या पार केली. विशेष म्हणजे, त्याने जवाहर नवोदय विद्यालय आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठीही पात्रता मिळवत ‘तिहेरी यश’ मिळवले आहे.
या यशाबद्दल भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते रुग्वेदचा सन्मान करण्यात आला. यावेळी काटे यांनी रुग्वेदच्या यशाचे कौतुक करत तो भविष्यात देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी रुग्वेदचे वडील शशिकांत शेवाळे, कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते. रुग्वेदच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.









