न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा पुणे शहर वाहतूक विभागाचा माजी ट्रॅफिक वार्डन असून, त्याच्याकडून ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास थेरगाव येथील गणेश मंदिर परिसरात एक महिला मॉर्निंग वॉक करत होत्या. त्यावेळी एका अनोळखी इसमाने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनींगठण जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण केले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपीचा मार्ग निश्चित केला आणि अखेर आरोपी सचिन मानसिंग चव्हाण (वय २७ वर्षे, रा. मान, पुणे) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सचिन चव्हाण हा यापूर्वी पुणे शहर वाहतूक विभागात (चतु:श्रृंगी विभाग) ट्रॅफिक वार्डन म्हणून काम करत होता. मात्र, वर्तवणूक चांगली नसल्याने त्याला ५ महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याने वाहतूक विभागातूनच एक ‘होंडा ॲक्टिव्हा’ स्कुटर चोरली होती आणि याच चोरीच्या गाडीचा वापर तो चैन चोरीसाठी करत होता.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपीकडून एक होंडा युनिकॉर्न मोटार सायकल, एक होंडा ॲक्टिव्हा स्कुटर, २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत: ४,७५,००० रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
या अटकेमुळे वाकड पोलीस ठाण्यातील २ आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.














