- पावसाळ्यापूर्वी संयुक्त पाहणी; जलनिस्सारण सुधारण्यावर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- एमआयडीसी परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमण व बुजविण्यामुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असून पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून अतिक्रमित नाले तात्काळ ओळखून कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला. जुन्या नकाशांतील अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी, अन्यथा पर्यायी स्टॉर्म वॉटर लाईन उभारावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
बैठकीस एमआयडीसी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.















