- काय म्हणाले स्थायी समिती सभापती अनं पक्षनेते?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ५२ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक प्रकरणावर चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ९ एप्रिल रोजी या प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली असून त्याचा अहवाल येण्यापूर्वीच झालेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
महापालिकेत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे यांनी या प्रकरणात गौप्यस्फोट करत पारदर्शक कारभारावर भर देत नगरसेवक आणि ठेकेदार निर्दोष असल्याचा दावा केला, तर दोष फक्त लेखापालांवर असल्याचे सांगितले.
सभापती बारणे यांनी तरतूद वर्गीकरणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या सह्या घेत बोगस उपसूचना देण्यात आल्याचा आरोप केला. जीबी, बैठकीत अशा उपसूचना मंजूर झालेल्या नव्हत्या. मात्र लेखा विभागाने पडताळणी न करता त्या पुढे ढकलल्या आणि आयुक्तांची दिशाभूल केली. हे एक बनावट रॅकेट असू शकते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कामांचे बील देण्यास विरोध नसून, प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांवरच आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षनेते शितोळे यांनी प्रशासकीय राजवटीतील गैरकारभार उघड केल्याचा दावा करत दोषींची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईची मागणी आयुक्तांकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.
चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी भूमिका जाहीर केल्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. आता समितीचा निष्कर्ष काय लागतो आणि प्रत्यक्षात दोष कुणावर निश्चित होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











