न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ एप्रिल २०२६) :- शहरातील वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात योग्य काळजी घेतल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
उष्माघातामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवताच त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व बाहेर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.










