न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छतेशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांसह अधिकारी उपस्थित होते.
झोपडपट्टी व दाट वस्तींमध्ये गटार, स्टॉर्म वॉटर लाईन, शौचालय दुरुस्ती व इमारत देखभाल कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. तसेच निगडी-दापोडी, सांगवी-किवळे, वाकड, रावेत, किवळे, पिंपळे निलख आदी भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली.
वाहतूक सुधारण्यासाठी पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री प्रकल्प व पिंपळे गुरव येथे सबवे उभारणीसाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य सेवांसाठी आकुर्डी व भोसरी रुग्णालयांसाठी उपकरणे, तसेच थेरगाव येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सुविधा मंजूर करण्यात आल्या.
शिक्षण, स्वच्छता, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व पीएमपीएमएल अनुदानासह विविध कामांना मंजुरी देत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात आली आहे.










