- आरोग्य विभागासाठी ४ वाहनांची होणार सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सक्शन युनिट वाहनांच्या भाडेकरारास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता सेवांमध्ये गती येणार असून आरोग्य विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून ४ सक्शन युनिट वाहने प्रति वाहन २ मजूर कर्मचाऱ्यांसह भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त निविदांपैकी मे. इंगळे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यांची निविदा सर्वात वाजवी ठरली.
सदर ठेकेदाराने प्रति वाहन प्रतिदिन ८ तासांसाठी (अमर्याद किलोमीटर) ₹४,६२४ इतका दर दिला असून तो तुलनात्मकदृष्ट्या योग्य असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच संबंधित ठेकेदार निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निविदेस महापालिका आयुक्तांनी दि. २५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली असून, एकूण ₹३ कोटी ५५ लाख २३ हजार इतक्या खर्चाच्या मर्यादेत हा करार करण्यात येणार आहे. निविदेतील अटींनुसार वस्तू व सेवा कर (GST) अदा करून ठेकेदारासोबत करार करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे.










