- भैरवनाथ पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस..
- संचालकांसह तब्बल ३६ जणांवर गुन्हा दाखल..
- ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि.१६ एप्रिल २०२६) :- खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या रकमेचा आणि संस्थेच्या निधीचा तब्बल ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेचे विद्यमान व माजी संचालक आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या मोठ्या कारवाईमुळे खेड तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१३-१४ ते २०१७-१८ या कालावधीत हा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. आरोपींनी संगनमताने कट रचून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या विविध कर्ज योजनांमध्ये आणि दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणात फेरफार केले. सुनील मथुरा काळे (वय ५५, रा. धनकवडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशा प्रकारे केली फसवणूक..
तपासात आणि ऑडिटमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार बोगस कर्ज वाटप: सोनेतारण, मालमत्ता तारण, वाहन तारण आणि वैयक्तिक कर्जांमध्ये खोटी कागदपत्रे वापरून रकमा लाटल्या. जमा पावत्यांच्या रकमा रोजकिर्दीला जमा न करणे, बँकेतून आणलेली रोकड दप्तरी न नोंदवणे. बँक भरणा केल्याचे दाखवून प्रत्यक्षात बँकेत पैसे जमा न करणे, बचत खात्यातून बोगस सह्या करून पैसे काढणे. ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’त गुंतवणूक केल्याचे भासवले, मात्र त्याचे कोणतेही पुरावे संस्थेच्या दप्तरी आढळले नाहीत. रोजकिर्दीची सुरुवातीची शिल्लक कमी दाखवून आणि बोगस खर्च टाकून हातशिल्लक घटवणे.
३६ जणांवर गुन्हे दाखल…
या प्रकरणात रामदास हिरामण कड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे यांच्यासह एकूण ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.










