- सायकल सेवेसाठी दररचना निश्चित..
- सार्वजनिक वाहतुकीसह नागरिकांना मिळणार स्वस्त, सुरक्षित पर्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत सहज, सुरक्षित आणि माफक दरात पोहोचता यावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “इजी पेडल” ई-बायसिकल प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी देण्यात आली आहे.
स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात बुधवारी पार पडली. बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्टार्टअप प्रकल्प…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि Prevai Technologies Private Limited, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्टार्टअप प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे मेट्रो, बस, रेल्वे स्टेशन यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना ई-बायसिकलचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी आटोक्यात येण्यास मदत होणार असून इंधन बचत, ध्वनी व वायुप्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकल्पाचा खर्च अनं दर…
दि. १४ मार्च २०२४ रोजी तीन संस्थांमध्ये करार करण्यात आला असून प्रकल्पाचा संपूर्ण खर्च Prevai Technologies कंपनी उचलणार आहे. तसेच मिळणाऱ्या महसुलातून महापालिकेला १० टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही सायकल डॉकिंग स्टेशनवर सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास सेवा उपलब्ध आहे. प्रकल्पाचे पूर्ण उद्घाटन झाल्यानंतर ही सेवा दिवसभर सुरू राहणार आहे. दरम्यान, कंपनीने २८ जानेवारी २०२६ रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सायकल सेवेसाठी दररचना निश्चित करण्यात आली असून त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रारंभी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी माफक दर ठेवण्यात आले आहेत.प्रकल्पाच्या प्रतिसादानुसार भविष्यात दररचनेत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. प्रकल्पाला स्थायी सभापतींनी मान्यता दिल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
निश्चित दर पुढीलप्रमाणे…
- सामान्य सायकल : ₹०.२५ प्रति मिनिट (किमान ₹५ प्रति प्रवास)
- सामान्य सायकल मासिक पास : ₹३५० (दररोज १०० मिनिटे)
- इलेक्ट्रिक सायकल : ₹०.५० प्रति मिनिट (किमान ₹१० प्रति प्रवास)
- इलेक्ट्रिक सायकल मासिक पास : ₹५५० (दररोज १०० मिनिटे)
- एकदिवसीय पास (सामान्य) : ₹६० (३०० मिनिटे)
- एकदिवसीय पास (इलेक्ट्रिक) : ₹१०० (३०० मिनिटे)










