- निगडीतील यमुनानगर प्रकल्पाची पाहणी; यशस्वी युवकांचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- निगडी येथील यमुनानगर परिसरातील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या प्रकल्पाची पाहणी करत त्यांनी प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला आणि यशस्वी युवकांशी संवाद साधत त्यांचा गौरव केला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, अनिल घोलप यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रकल्पाचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर लांडगे म्हणाले की, बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षण अत्यावश्यक असून उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या उपक्रमांमुळे युवकांना रोजगारासोबत स्वावलंबनाची संधी मिळत आहे.
प्रशिक्षणाची गुणवत्ता व रोजगार संधीबाबत समाधान व्यक्त करत महापालिका भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार करून अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










