- आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगांव दाभाडे (दि.१६ एप्रिल २०२६) :- मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा शासन निर्णय जाहीर झाला असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला आंद्रा धरण (ता. मावळ, जि. पुणे) येथून घरगुती (पिण्याच्या) वापरासाठी ५.०१४ दशलक्ष घनमीटर (MCM) इतक्या पाण्याचा Bulk Water Entitlement मंजूर करण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सन २०४८ पर्यंतचा विचार करून घेतलेला हा निर्णय शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरणार आहे. यापूर्वी इंद्रायणी व पवना नदीतून काही प्रमाणात पाणी आरक्षण असले तरी, वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही अतिरिक्त मंजुरी देण्यात आल्याने तळेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामागे आमदार सुनील शेळके यांचा सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. धरणातून पाणी आणण्याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करत शासनस्तरावर विषय लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, तळेगाव शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक मूलभूत सुविधांमध्ये पाणीपुरवठा हा कणा मानला जात असल्याने, या निर्णयामुळे मावळ तालुक्याच्या शहरी विकासालाही गती मिळणार आहे.
शासनाने या पाणी आरक्षणास काही अटी व शर्ती लागू केल्या असून, पाणी वापरासाठी आवश्यक करारनामे, नियोजनबद्ध वितरण व्यवस्था, जलप्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक राहणार आहे. तसेच, मंजूर आरक्षणानुसार प्रत्यक्ष पाणी उचल सुरू न झाल्यास आरक्षण रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. एकूणच, आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे तळेगाव दाभाडे शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावर मोठा दिलासा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.










