- सोशल मीडियाला लोकशाहीचा ‘पाचवा स्तंभ’ मानत देशभर अभियान राबवणार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ एप्रिल २०२६) :- भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात “संविधान लीडरशिप प्रोग्राम” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या अभियानाच्या माध्यमातून युवकांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोशल मीडियाला लोकशाहीचा ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित करत नागरिकांच्या समस्या, शासनाच्या धोरणांवरील प्रतिक्रिया तसेच स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांना युवक काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत त्यांच्या समस्यांवर ठामपणे भूमिका घेतली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांचे स्वतंत्र नेटवर्क तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड येथे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अभियान प्रभारी गौरव चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यांनी अधिकाधिक तरुणांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. इच्छुकांनी मोबाईलवर मिस कॉल देऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार असल्याची माहिती देण्यात आली. हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव व शहर निरीक्षक सत्यजित बिरादार, विकास सुपणार, उमेश कंधारे, स्वप्निल बनसोडे, विशाल कसबे, अजिंक्य देसाई, मयूर रोकडे, शोएब कुरेशी, रोहित शेळके, जय ठोंबरे, अक्षय शिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










