- पुण्यातील बोगदा आणि मावळातील नदी सुधार योजनेसाठी कर्जाऊ निधी उभारणीचा घाट?..
- प्रचंड खर्च आणि निधी उभारणीतील अनिश्चिततेमुळे प्रकल्पांवरच प्रश्नचिन्ह?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ एप्रिल २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रस्तावित मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर आर्थिक ताण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येरवडा ते कात्रज भूमिगत दुहेरी बोगदा आणि पवना नदी सुधार योजना या दोन्ही प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारणीची गरज असल्याने प्राधिकरणाला कर्ज व सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलचा मोठ्या प्रमाणात आधार घ्यावा लागणार आहे.
सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेला बोगदा प्रकल्प शहरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असला, तरी एवढ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे त्याच्या आर्थिक शाश्वततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराच्या बाह्य भागासाठी सुरू असलेल्या रिंग रोड प्रकल्पांसोबतच हा अतिरिक्त खर्च भविष्यातील आर्थिक नियोजनावर ताण आणू शकतो.
दुसरीकडे, पवना नदी स्वच्छतेसाठी सुमारे २१८ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असली, तरी त्यासाठीही आवश्यक निधी उभारणे सोपे नसल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या निधीसाठी आवश्यक अटी पूर्ण करताना किमान निम्मा निधी कर्ज किंवा अन्य वित्तीय साधनांद्वारे उभारावा लागणार असल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, वाढत्या कर्जबाजारीपणामुळे भविष्यात प्राधिकरणाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रकल्पांसाठी विविध वित्तीय पर्यायांचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रचंड खर्च आणि निधी उभारणीतील अनिश्चितता लक्षात घेता, या प्रकल्पांची गती आणि अंमलबजावणी याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.










