- चौकशी अहवाल येण्याआधीच नगरसेवक व ठेकेदार निर्दोष कसे?..
- सर्वसाधरण सभा वादळी होण्याची शक्यता?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची एप्रिल २०२६ ची मासिक सर्वसाधारण सभा आज, सोमवार (दि. २०) रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार असून, या सभेत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर बोगस उपसूचनांच्या आधारे मोठ्या प्रमाणात निधी वितरित केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात काही नगरसेवक व ठेकेदारांचाही सहभाग असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली होती. समितीला अल्पावधीत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र निश्चित मुदत उलटल्यानंतरही अहवाल सादर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यातच भाजपवरही संबंधित नगरसेवक व ठेकेदारांना चौकशी अहवाल येण्यापूर्वीच क्लीन चीट दिल्याचा आरोप आहे. यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत विरोधक आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे असून, प्रशासनाकडून नेमके काय स्पष्टीकरण दिले जाते आणि चौकशी अहवालाबाबत कोणती भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










