न्युज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १८ एप्रिल २०२६) :- भरधाव वेगाने दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील फोर्स मोटर्स कंपनीसमोर, थरमॅक्स चौक येथे घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गोविंद पवार (वय २१) हा त्याचा मित्र पवन गव्हाळे आणि आरोपी सिद्धार्थ अजित धाईजे (वय २०) यांच्यासोबत पल्सर मोटरसायकलने प्रवास करत होता. सिद्धार्थ धाईजे हा दुचाकी चालवत होता. त्याने आपली दुचाकी अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले.
वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला (डिवायडर) जोरात धडकली. या अपघातात विकास पवार याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर पवन गव्हाळे हा जखमी झाला आहे.
याप्रकरणी मृत विकासचे भाऊ धनंजय गोविंद पवार (वय ४८, रा. चिखली) यांनी १७ एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ धाईजे याच्याविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक (PSI) पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









