न्युज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि.२३ एप्रिल २०२६) :- एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडाचे बनावट कागदपत्र तयार करून सुवर्णयुग सहकारी बँक, निगडी शाखेकडून तब्बल ₹७ कोटी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्याप्रकरणी चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत शिरीन रऊफ शेख, ( क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिवाजीनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जुलै २०१४ पासून आजपर्यंत आकुर्डी येथील सुवर्णयुग सहकारी बँकेच्या शाखेत घडली.
आरोपींमध्ये अॅलेन अरुण बनसोडे (वय ४७), एक महिला आरोपी (वय ४८), सोलोमन अॅलेन बनसोडे (वय २९) आणि सेवारा बुरखानोबा (वय ३५, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी मॅसकॉर्प कंपनीचे तत्कालीन संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून पिंपरी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीचा भूखंड क्रमांक ४ डी ३ ब्लॉक (क्षेत्र १८६४ चौरस मीटर) यासंबंधित बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे सुवर्णयुग सहकारी बँकेत सादर करून संबंधित मालमत्तेवर कर्जाचा बोजा नोंदवण्यासाठी वापरण्यात आली. त्याआधारे बँकेकडून ₹७.५० कोटींचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी लेखी तक्रारीनंतर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कलगुटगे करत आहेत.











