- संचालकांसह आरोपी अटकेत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि.२३ एप्रिल २०२६) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित कंपनीचे संचालकांसह आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पांडुरंग पदमाकर केंद्रे (वय २३, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ पासून ते आजपर्यंत विप्रो सर्कल, फेज २, हिंजवडी येथे ही घटना घडली.
आरोपींमध्ये अॅक्युअर सॉफ्टटेक प्रा. लि. या कंपनीचे संचालक अमोल महाडीक, ओमकार महाडिक तसेच कंपनीशी संबंधित इतर व्यक्ती व विविध कन्सल्टन्सींचा समावेश आहे.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर साक्षीदारांना ट्रेनींग व नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून कंपनीच्या खात्यावर तसेच विविध कन्सल्टन्सीमार्फत पैसे स्वीकारले. ट्रेनींगच्या नावाखाली काम करून घेतले, मात्र कोणताही प्रोजेक्ट न देता वेगवेगळी कारणे सांगत वेळ मारून नेला.
फिर्यादीने भरलेली रक्कम परत मागितल्यावर आरोपींकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. तसेच इतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत डिपॉझिट व कमिशनच्या नावाखालीही पैसे उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकारात फिर्यादी व इतरांना एकूण ₹७,८०,००० इतकी रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या संबंधित कंपनीचे कार्यालय बंद असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करत आहेत.











