- पदाधिकाऱ्यांची वकिली निष्फळ..
- त्या उर्वरित कामासाठी दोन नवे ठेकेदार नेमणार…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पातील कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पूर्वीचा ठेकेदार बडतर्फ करण्यात आला आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, उर्वरित सुमारे ३० टक्के कामासाठी दोन स्वतंत्र ठेकेदार नेमले जाणार आहेत.
दरम्यान, या उर्वरित कामासाठी जुन्याच ठेकेदाराला पुन्हा संधी देण्याचा सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचा मनसुबा असल्याची चर्चा होती. संबंधित ठेकेदाराने महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याचेही सांगितले जाते. याबाबत सभेतही काही पदाधिकाऱ्यांनी जुन्या ठेकेदाराच्या बाजूने भूमिका मांडत त्यालाच काम देण्याबाबत वकिली केली. मात्र, प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारत नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला.
खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मुंबई येथील ऑफशेर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराकडे हे काम होते. मात्र, अनेकदा सूचना देऊनही काम पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा विभागाने त्याला बडतर्फ केले.
उर्वरित कामासाठी १० एप्रिल रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत भामा-आसखेड धरण ते नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिमी जलवाहिनी आणि पुढे तळवडे व देहूपर्यंत १४०० मिमी जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ८४ कोटी ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र दोन ठेकेदार नेमले जाणार असून, काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.










