- केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ एप्रिल २०२६) :- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनानुसार येत्या 20 मे 2026 रोजी राज्यभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व औषध दुकानदारांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी दिली.
औषध व्यवसायाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि औषध वितरण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाचा उद्देश नागरिकांना अडचणीत आणणे नसून, आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा शक्य त्या प्रमाणात सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील, असेही सांगण्यात आले. औषध विक्रेते हे आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नागरिक, रुग्ण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
औषध विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे…
- ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करून GSR 817 (28 ऑगस्ट 2018) मागे घ्यावा.
- कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलती (Heavy Discount) थांबवाव्यात.
- बनावट औषधांवर कठोर कारवाई करून देशाचे संरक्षण करावे आणि GSR 220 (26 मार्च 2020) मागे घ्यावा.










