- नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ तसेच विविध क्षेत्रीय स्तरांवर आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, सर्व कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.











