- त्या बैठकीनंतर ‘वेगळ्या अजेंड्या’ची शहरभर चर्चा..
- राजकीय वर्तुळात सर्वत्र कुजबुज…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सोमवारी (दि. २७) राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोणताही अधिकृत किंवा पूर्वनियोजित दौरा नसताना त्यांनी महापालिकेत हजेरी लावल्याने प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
या बैठकीदरम्यान शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मात्र, बैठकीसाठी स्थानिक आमदार महेश लांडगे, शंकर जगताप हे बैठकीनंतर उशिराने सभागृहात दाखल झाले. त्यामुळे या भेटीची अचानकता अधिक ठळकपणे जाणवते.
राज्यमंत्री मिसाळ यांनी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकल्पांची माहिती घेतली असली, तरी त्यांच्या या दौऱ्यामागे केवळ विकासकामांचा आढावा हा उद्देश होता की काही वेगळाच राजकीय अजेंडा होता, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः अलीकडील साठ कोटींच्या कथित घोटाळ्यामुळे भारतीय जनता पक्षाची शहरात होत असलेली बदनामी लक्षात घेता, त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा काही संदेश घेऊन आल्या होत्या का, अशीही कुजबुज महापालिका आवारात ऐकायला मिळत आहे.
या अचानक दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात नवे संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली असून, पुढील काही दिवसांत याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











