न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ एप्रिल २०२६) :- माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी विविध ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पजवळ जलवाहिनीतून होणारी गळती तातडीने थांबविण्याचे आदेश देण्यात आले. या गळतीमुळे कामात अडथळे निर्माण होत होते. तसेच बाणेर आणि हिंजवडी परिसरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड मार्फत राबविला जात आहे. कामाची गती वाढवतानाच गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.












