- विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयासाठी ऐनवेळी नगरसेविकांच्या सहीने उपसूचना..
- “अझरबैजान” मध्ये ‘वर्ल्ड अर्बन फोरम’ ला लावणार हजेरी…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या एका “परदेश दौऱ्या”ची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरी विकासाच्या जागतिक परिषदेसाठी महापौरांचा बाकू (अझरबैजान) दौरा प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे जवळपास नऊ लाखांचा खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. विशेष म्हणजे, हा विषय मूळ विषयपत्रिकेवर नव्हता. तो आयत्या वेळी सभेत मांडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat मार्फत आयोजित वर्ल्ड अर्बन फोरम – 13 (WUF-13) ही परिषद 17 ते 22 मे 2026 दरम्यान Baku, Azerbaijan येथे होणार आहे. या परिषदेत महापौर रवि लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले सहभागी होणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
महानगरपालिकेच्या मते, या परिषदेमुळे शाश्वत शहरी विकास, स्मार्ट सिटी संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. शहराच्या भविष्यातील विकास आराखड्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या दौऱ्याचे व्यवस्थापन मे. व्हिजन हॉलिडेज यांच्याकडे देण्यात येणार असून, खर्च नगरसचिव विभागाच्या “प्रशिक्षण मा. सन्माननीय नगरसदस्य” या लेखाशिर्षातून करण्याचा प्रस्ताव आहे. या खात्यात 2026-27 साठी 50 लाखांची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला अपक्ष नगरसेविका शालिनी गुजर यांनी सुचक तर भाजप नगरसेविका मनिषा चिंचवडे यांनी अनुमोदन दिले आहे.











