- अत्याधुनिक उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात; सभापती अभिषेक बारणे यांच्या सूचना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- थेरगाव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य कॅन्सर हॉस्पिटलची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी पार्किंग, सुरक्षा, ऑक्सिजन व पाणी पुरवठा तसेच स्वच्छतेच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या हॉस्पिटलमध्ये लिनियर ॲक्सिलरेटर, ब्रॅकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनर यांसारखी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होणार आहे. स्तन, फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलोरेक्टल आणि गर्भाशयाच्या कर्करोगावर विशेष उपचार केले जाणार असून केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया व पुनर्वसन सेवा एकाच छताखाली मिळतील.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाशी संलग्न केल्यामुळे उपचार अत्यल्प दरात किंवा मोफत मिळणार आहेत. या प्रकल्पामुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.












