- नगरसेविका श्रुती वाकडकर यांच आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- ताथवडे परिसराचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश होऊन सुमारे १७ वर्षांचा कालावधी उलटूनही येथील जिल्हा परिषद शाळा अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीतच कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर शाळेत सुमारे ४३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना आवश्यक त्या मूलभूत व आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. वर्गखोल्यांमध्ये पुरेशा बाकड्यांचा अभाव असल्याने अनेक विद्यार्थ्यांना खाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. याशिवाय स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नियमित आरोग्य तपासणी, क्रीडा साहित्य, संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा यांसारख्या अत्यावश्यक सुविधा अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर तसेच नगरसेविका रेश्मा भुजबळ उपस्थित होत्या.
यामध्ये ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा तात्काळ महानगरपालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यायी उपाय म्हणून ताथवडे परिसरात महानगरपालिकेमार्फत नवीन, सुसज्ज व सर्व सुविधा युक्त शाळा इमारत उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क व सुरक्षितता लक्षात घेता हा विषय अत्यंत तातडीचा असून प्रशासनाने याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.













