- देहूरोड गोळीबार प्रकरणानंतर अवैध शस्त्रांवर कारवाई तीव्र; ८ लाखांचा शस्त्रसाठा आणि ४६ जिवंत काडतुसे हस्तगत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- देहूरोड परिसरात व्यापाऱ्याची गोळीबार करून हत्या झाल्याच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध अग्निशस्त्रांविरोधी मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट १ ने मोठी कारवाई करत ४ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
देहूरोडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म ॲक्टच्या एका गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी, ९ देशी कट्टे, ५ मॅक्झीन, ४६ जिवंत काडतुसे, २ वाहने, असे एकूण किंमत सुमारे ८ लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.
अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०, रा. थेरगाव), वैभव अशोक शेटे (वय ३१, रा. थेरगाव), सौरभ धनंजय जाधव (वय २७, रा. पाषाण), अक्षय अशोक कांबळे (वय ३१, रा. पाषाण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करत आहेत.














