- ठेकेदारांमार्फत साहित्य खरेदीत गैरव्यवहार?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शालेय साहित्य पुरवठा प्रक्रियेत ‘ई-रुपी डिजिटल प्रणाली’च्या माध्यमातून पुन्हा ठेकेदारांमार्फत साहित्य खरेदी करण्याचा घाट घालण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जुन्या ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ (DBT) पद्धतीनेच विद्यार्थ्यांना थेट लाभ द्यावा, असा सुर शहरवासियांकडून निघत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्याची DBT पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ही पद्धत बंद करून ‘ई-रुपी डिजिटल प्रणाली’च्या नावाखाली ठेकेदारांमार्फत साहित्य पुरवठा सुरू केला. यात विद्यार्थी हितापेक्षा अधिकारी आणि ठेकेदारांचे हित साधले जात असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे.
तसेच, मागील वर्षी अनेक शाळांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर अखेरपर्यंत शालेय साहित्याचा पुरवठा पूर्ण झाला नव्हता. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासकीय तपासणीत काही ठेकेदारांचे साहित्य दर्जाहीन आढळून आले होते. तरीही त्यांच्याकडूनच पुरवठा करण्यात आला. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महापालिकेने थेट उत्पादक कंपन्यांशी करार करून साहित्य खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकते आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य वेळेत मिळू शकते, तसेच, शालेय साहित्य पुरवठ्याचा विषय हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित असल्याने ई-रुपी प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ठेकेदारी पद्धत रद्द करून केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार थेट DBT पद्धतीनेच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
“गेल्या दोन वर्षांत शालेय साहित्य पुरवठा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत आणि दर्जेदार साहित्य मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ठेकेदारी पद्धतीऐवजी थेट DBT पद्धतीचा अवलंब करावा.”
-राहुल कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ते….














