- विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी उपयुक्त ठरेल – महापौर रवि लांडगे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यान परिसरात बहुउद्देशीय दोन मजली विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा श्वास आहेत. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्रामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.”
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, निलेश नेवाळे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या माध्यमातून उद्यानांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे महापौरांनी सांगितले. या विरंगुळा केंद्रासाठी ६ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित असून कामाची मुदत ८ महिन्यांची आहे.
















