- १७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण; गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक जाहीर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून एकूण निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. मराठी माध्यमाच्या १७ शाळांचा निकाल ८८.५९ टक्के, तर उर्दू माध्यमाच्या ८ शाळांचा निकाल ९७.८७ टक्के लागला आहे.
यंदा २५ शाळांमधून २ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यामध्ये २ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे,” असे सांगितले.
महापालिकेकडून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळविणाऱ्यांना ५० हजार रुपये, तर ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळविणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.














