- “अधिकारी अजूनही प्रशासकीय राजवटीच्या मानसिकतेत”; निषेध करत सभाच गुंडाळली…
- समिती सदस्यांची राजीनाम्याची भाषा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य पर्यटन व सांस्कृतिक समितीची आढावा बैठक शुक्रवारी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने संतप्त सदस्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध करत सभा तहकूब केली.
समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सदस्य भाऊसाहेब भोईर, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, योगेश लांडगे आणि जितेंद्र ननवरे उपस्थित होते. शहरातील खेळाडू, कलाकार, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा अपेक्षित असताना अधिकारीच गैरहजर राहिल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना सभापती कैलास कुटे म्हणाले, “बैठकीची वेळ दुपारी तीन वाजताची असताना संबंधित अधिकारी तब्बल एक ते दीड तास उशिरा देखील उपस्थित राहिले नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि समितीला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात आली.”
समिती सदस्य योगेश लांडगे यांनीही अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. “अधिकारी अजूनही प्रशासकीय राजवटीतील मानसिकतेतून बाहेर आलेले दिसत नाहीत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रश्नांना महत्त्व न देणे ही गंभीर बाब आहे. 15 पैकी फक्त दोन अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना प्रशासनाला एक टक्का देखील जनतेची काळजी नाही, असे असेल तर आम्ही आमच्या पूर्ण समिती सदस्य राजीनामा देऊ. चुकीचे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचललाच पाहिजे,” असा इशारा त्यांनी दिला.
या प्रकारामुळे महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.














