- सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छतेसह पुनर्वसनाची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील भुयारी मार्ग आणि स्कायवॉक सुरक्षेअभावी ओस पडत असून, तेथे अधिकृत फेरीवाल्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महापालिका फेरीवाला समितीच्या सदस्या सौ. आशा बाबा कांबळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. शहरातील सुमारे ११ भुयारी मार्गांमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिक विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक हे मार्ग वापरणे टाळत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कटलरी, बेल्ट, पर्स विक्रेते यांसारख्या छोट्या फेरीवाल्यांना अधिकृत जागा दिल्यास तेथे सतत वर्दळ राहून ‘नॅचरल सर्व्हिलन्स’ निर्माण होईल व सुरक्षेची भावना वाढेल, असे कांबळे यांनी सांगितले. तसेच फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासह महापालिकेच्या महसुलातही भर पडेल, असा दावा त्यांनी केला. सर्व मार्गांमध्ये तातडीने सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि विशेष स्वच्छता पथक नेमण्याची मागणीही त्यांनी केली.














