- पीएमआरडीएच्या विकास कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला आढावा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पवना आणि इंद्रायणी नदीपात्रालगत पीएमआरडीएकडून परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करून एसटीपी कार्यान्वित आहेत का, याची तपासणी करावी. थेट नदीत सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही माहिती द्यावी, अशा कठोर सूचना खासदार Shrirang Barne यांनी दिल्या. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पीएमआरडीए हद्दीतील मावळ लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा गुरुवारी घेण्यात आला. बैठकीला आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवरील सुविधा वाढविणे, लोहगड-विसापूर रस्ता विकसित करणे, भाजे लेणी परिसरात सुरक्षा कठडे उभारणे आणि कारला फाटा-मळवली रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही बारणे यांनी दिल्या.
देहू ते येलवाडी या तळेगावला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने मोठे खड्डे पडले असून वाहतूक धोकादायक बनली आहे. देहू आणि भंडारा डोंगर येथे वारकऱ्यांची मोठी वर्दळ असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.














