न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांना प्रवेश सुलभ करणे, भेटीची डिजिटल नोंद ठेवणे व कार्यालयीन सुरक्षा बळकट करणे या उद्देशाने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय, मुंबई येथे अभ्यागत व प्रवेश व्यवस्थापनासाठी असणाऱ्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या महानगरपालिका कार्यालयात प्रवेशासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘स्वागतम ई-पास’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे खाते (लॉगिन) तयार करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक तसेच आधार क्रमांक यांची नोंद करावी लागेल. खाते तयार करण्याची प्रक्रिया एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदणी करता येईल. नोंदणी करताना तसेच पुढील प्रत्येक प्रवेशाच्या वेळी नागरिकांचा मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे प्रमाणित केला जाईल.
प्रवेश नोंदणी करताना नागरिकांनी किमान एक आणि कमाल तीन विभागांना भेट देण्याची विनंती नोंदवावी लागेल. नोंदणी करताना नागरिकांना ई-पास काढावयाच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांपर्यंतचे (शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून) उपलब्ध दिनांक दिसतील. त्यानुसार आवश्यक दिनांक व विभाग निवडणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर प्रवेशासाठी क्यूआर कोड डाउनलोड करता येईल. जर क्यूआर कोड तात्काळ डाउनलोड केला गेला नाही, तरीही तो नागरिकांच्या खात्यामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहील. आगाऊ नोंदणी केल्यास क्यूआर कोड संबंधित प्रवेशाच्या दिवशीच डाउनलोड करता येईल. महानगरपालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांचा प्रवेश सुनिश्चित केला जाईल. ही प्रक्रिया काही सेकंदांमध्ये पूर्ण होत असल्याने प्रवेशद्वारावर गर्दी किंवा विलंब होणार नाही.
याशिवाय ज्या नागरिकांनी आगाऊ नोंदणी केलेली नाही किंवा खाते तयार केलेले नाही, त्यांनी प्रवेशद्वारावर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर प्रवेश देण्यात येईल. या प्रणालीमुळे नागरिकांना कमीत कमी वेळेत इमारतीमध्ये प्रवेश मिळणे तसेच प्रत्येक प्रवेशाची अचूक नोंद महानगरपालिकेकडे राहणे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे, असे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वागतम ई-पासबाबत नियमावली…
– नागरिकांनी संबंधित अधिकारी/विभागाशी पूर्वनियोजित भेट निश्चित करूनच स्वागतम ई-पाससाठी अर्ज करावा.
– सुरक्षा विभागाकडून प्रवेशद्वारावर स्वागतम ई-पासची पडताळणी केल्यानंतरच संबंधित व्यक्तीस प्रवेश देण्यात येईल. तसेच ई-पासमध्ये नमूद केलेल्या वेळ, दिनांक व उद्देशासाठीच प्रवेश वैध राहील.
– नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी विभागांना भेटीची वेळ ही दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० अशी राहील.
– अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०६/०४/२०२६ रोजीच्या परिपत्रकान्वये दर मंगळवार व गुरुवार दुपारी ४:०० ते सायंकाळी ६:०० ही वेळ निश्चित करण्यात आलेली असून, फक्त त्याच वेळेस नागरिकांना अधिकारी वर्गाला भेटता येईल.
– सर्व उपोषण तथा आंदोलनासाठी आलेल्या शिष्टमंडळासाठी मुख्य प्रवेशद्वारावर हस्तलिखित प्रवेशपास दिला जाईल.
– सर्व शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्रावर प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र नसल्यास ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे प्रवेश पास काढावा लागेल.
– कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी मनपा कार्यालयामध्ये विभागामार्फत आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या सर्व अभ्यागतांसाठी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेमध्ये प्रवेशासाठी संबंधित विभागाचे पत्र असणे आवश्यक आहे. सदर पत्रावर अभ्यागतांची नावे नमूद असणे आवश्यक आहे.
– ई-पासचा गैरवापर, बनावट माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नागरिकांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या प्रवेशाची नोंद असणे आवश्यक आहे. स्वागतम ई-पास प्रणालीमुळे नागरिक कोणत्या विभागाला किती वेळा भेट देतात, याची माहिती मिळणार असून त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्याची तयारी महापालिका प्रशासनास करणे सोपे होईल. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.
-डॉ. विजय सुर्यंवशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.













