न्युज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. ०९ मे २०२६) :- खेड तालुक्यातील करंजविहीरे गावात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा खून करून तिच्याकडील सोन्याचे दागिने जबरीने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुबाई विठोबा मरगज (वय ८०) या महिलेचा दि. २ मे रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करंजविहीरे गावच्या हद्दीतील मरगज वस्ती येथील पायटा परिसरात खून करण्यात आला. आरोपी कैलास कुंडलिक मरगज (वय अंदाजे ३६, रा. करंजविहीरे, ता. खेड, जि. पुणे) याने सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने मृत महिलेच्या अंगावरील अंदाजे २५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चंद्रकारे व दोन मणी असलेले दागिने जबरीने काढून घेतले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून करंजविहीरे ते धामणे रोडलगत असलेल्या भामा नदी पात्रात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी समिर बाळू मरगज (वय २७, व्यवसाय शेती, रा. करंजविहीरे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली असून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडीक करीत आहेत.














