- चाकू-चॉपर हल्ल्यात चुलत भाऊ गंभीर जखमी; दोघांना अटक
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ मे २०२६) :- प्रेमप्रकरणाच्या वादातून थेरगाव परिसरात १९ वर्षीय तरुणाची चाकू आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) रात्री घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
सुभान हमीद शेख (वय १९, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्शद रमजान शेख (वय २१, रा. थेरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.
याबाबत मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभान आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला संबंधित तरुणीच्या आईचा विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेल्या विशाल सूर्यवंशी याने सुभानला या संबंधातून दूर राहण्याचा इशारा दिला होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.
शुक्रवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण दूध डेअरीसमोरील रस्त्यावर विशाल आणि अनिकेत यांनी सुभानला अडवले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता संशयितांनी जवळील चाकू आणि चॉपरने सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुभानचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सुभानला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अर्शद शेख याच्यावरही संशयितांनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













