- वादळी वाऱ्यामुळे मेट्रो कामाचा पत्रा बीआरटी मार्गात कोसळला..
- सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; नागरिक थोडक्यात बचावले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारपासून वादळी वारे सुटल्याने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच निगडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान उंचावरील पत्र्याच्या छताचा मोठा पत्रा अचानक खाली कोसळून थेट बीआरटी मार्गात पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिक थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दुपारनंतर अचानक जोरदार वारे वाहू लागले. निगडी परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना उंचावर बसविण्यात आलेला पत्र्याचा भाग वाऱ्याच्या जोरामुळे तुटून खाली पडला.
हा पत्रा थेट बीआरटी मार्गात कोसळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ होती. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
स्थानिक नागरिकांनी मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













