- पाणीपुरवठा पाईपमध्ये महिलेचा पाय अडकला..
- दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका..
- महापालिकेच्या निष्काळजीपणाचा नागरिकांकडून संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. १३ मे २०२६ :- काळेवाडी येथील पाचपीर चौक परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
दुपारी १२ च्या सुमारास 65 वर्षीय वृध्द महिला या रस्त्यावरून जात असताना, पाणीपुरवठा वाहिनीच्या व्हॉल्व्हसाठी असलेल्या पाच फूट खोल पीव्हीसी पाईपमध्ये त्यांचा पाय अचानक घसरला. तो पाय थेट गुडघ्यापर्यंत आत अडकला. पाय वळल्यामुळे त्यांना साधी हालचाल करणेही अशक्य झाले होते. वेदनांनी विव्हळणाऱ्या आजींची अवस्था पाहून परिसरातील नागरिक गोळा झाले.
नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी जवळपास दोन तास अथक प्रयत्न करत संबंधित महिलेची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या बाजूला उघड्या अवस्थेत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाईपमध्ये महिलेचा पाय खोलवर अडकला होता. त्यामुळे महिलेला तीव्र वेदना सहन कराव्या लागत होत्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवत पाईप कापून महिलेची सुटका केली.
दरम्यान, संपूर्ण बचावकार्य जवळपास दोन तास सुरू असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे शहरातील उघडे पाईप, अर्धवट कामे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













